मुंबई – स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला सध्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या मालिकामध्ये नवा ट्विस्ट आल्याने प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारेची एका नव्या रुपात या मालिकेत पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. यात ती एका गावरान अंदाजात दिसत असल्याने प्रेक्षकांचा देखील याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
नुकतेच इनस्टाग्रामवर उर्मिलाने चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तिने दिग्दर्शकाची तक्रार केली आहे. उर्मिला आणि इतर कलाकार भर उन्हात मालिकेचं चित्रीकरण करत आहेत. मात्र दिग्दर्शक सावलीत बसल्याचे तिने व्हिडिओतून दाखवले आहे.
या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘हे पाहा. हा आहे तळपता सूर्य आणि याखाली आम्ही शूटिंग करतो. संपूर्ण चित्रीकरणादरम्यान मी अशीच असते. मंजुळा… आता मी तुम्हाला दाखवते आमचे दिग्दर्शक. आम्हाला उन्हात शूटिंग करायला लावून स्वतः शेडखाली, सावलीत बसलेत तेही फॅन लावून. क्या ये ना इन्साफी हैं? कृपया कंमेंटमध्ये सांगा.’ यावेळी उर्मिलाने डोक्यावर ओढणी घेतली आहे, तर डोळ्यावर गॉगल लावून छत्राखाली उभी राहून उन्हापासून स्वत:चे रक्षण करताना दिसते.
View this post on Instagram
सध्या उर्मिलाचा गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एका नेटकऱ्याने कमेन्ट करत लिहिले की, ‘मंजुळाला उन्हात ठेवतो, म्हणजे काय? दाखवं तुझा इंगा, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘तळपत्या उन्हात तुमची कला चमकून येईल.’