नवी दिल्ली – देशात करोना महामारीचा संसर्ग वाढला असून पुन्हा करोनाबाधितांची रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यातच ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये निर्बधही लागू करण्यात आले आहे. या पार्श्वूभूमीवर शुक्रवारपासून होणारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीने परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशभरातून जवळपास 9,200 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
शुक्रवार, 7 जानेवारीपासून सुरू होणारी युपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिले आहे. यूपीएससी मुख्य परीक्षा 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. या तारखांना यूपीएससीचे नऊ पेपर्स घेण्यात येणार असून त्यापैकी दोन पेपर्स हे क्वॉलिफाईंग स्वरुपाचे असतील तर इतर सात पेपर्सचे गुण अंतिम यादीसाठी धरण्यात येणार आहेत.