नवी दिल्ली – पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जरोदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रियंका उत्तर प्रदेशात ठाण मांडून आहे. मात्र आता प्रियंका गांधी यांना आव्हान देण्यात आले आहे. एका अभिनेत्रीने प्रियंका यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मिस इंडिया मोस्ट पॉप्युलर फेस २०१८ रचना सिंह यदुवंशी हिने प्रियंका यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. एका चित्रपटाच्या शुटसाठी वाराणसी येथे दाखल झालेल्या रचना हिने काशी येथे झालेल्या विकासाचं आणि महिला सक्षमीकरणासाठी झालेल्या कामाचं कौतुक केलं.
यावेळी रचना यांनी देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कडक कायदा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रियंका गांधी यांच्याकडून महिलांना देण्यात येत असलेल्या प्रधान्यावर रचनाने म्हटलं की, त्यांना हे केवळ निवडणुकीच्या काळात आठवतं.
प्रियंका ज्या पद्धतीने अचानक राजकारणात आल्या, त्याच प्रमाणे मी देखील राजकारणात आले तर त्यांच्यापेक्षा नक्कीच अधिक मतं मला मिळतील. आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षाकडून ऑफरही मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.