अयोध्या (उत्तर प्रदेश) – सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला भेट देऊन तेथे दर्शन घेतले आणि राम मंदिर उभारणीच्या कार्याची त्यांनी पहाणी केली.
अयोध्येत उभारले जात असलेल्या राम मंदिराचे भाजपने याही निवडणुकीत राजकीय भांडवल केले असून मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या भेटीकडे त्याच नजरेने बघितले जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही अलीकडेच अयोध्येतील मंदिरस्थळाला भेट देऊन त्यांनीही राम मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेतला होता. राज्यात सात टप्प्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत.
27 फेब्रुवारी रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान होणार असून अयोध्या परिसरातील मतदार संघात या टप्प्यात मतदान होत आहे. रायबरेली, अमेठी बरोबरच पूर्व उत्तर प्रदेशातील मतदार संघांमध्येही या टप्प्यात मतदान होणार आहे.