ऋषी सुनक यांच्या हस्ते 50 पेन्सच्या नाण्याचे अनावरण

लंडन  – ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या हस्ते आज 50 पेन्स किंमतीच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. ब्रिटनचा वैविध्यपूर्ण इतिहास आणि अल्पसंख्य समाजाचे योगदान याची दखल या नाण्यातून घेतली गेली आहे.

या नाण्यावर “डायव्हर्सिटी बिल्ट ब्रिटन’ अशी अक्षरे कोरलेली आहे. अशी सुमारे 25 लाख नाणी सोमवारपासून चलनामध्ये वितरीत केली जाणार आहेत.

ब्रिटनच्या उभारणीमध्ये अल्पसंख्यांक समाजाचे योगदान अधोरेखित करण्यासाठी “वुई टू बिल्ट ब्रिटन’ ही मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ब्रिटनमधील वांशिक अल्पसंख्यांक समाजातील प्रमुख नेत्यांच्या मुद्रा भविष्यातील नाणी आणि नोटांवर मुद्रीत करण्यात येणार आहेत.

यामध्ये ब्रिटीश-भारतीय गुप्तहेर नूर इनायत खान यांच्या मुद्रेचाही समावेश असणार आहे. हे नाणे आणि मालिकेतील बाकीची नाणी ब्रिटनवर वांशिक अल्पसंख्यक समुदायाने बनवलेल्या अतिशय मोठ्या योगदानाला योग्य श्रद्धांजली असेल. असे सुनक म्हणाले.

या नाण्याची रचना राजघराण्याच्या टांकसाळीच्या डिजायनर डोमिनिक इव्हान्स यांच्या प्रेरणेतून आहे. त्या स्वतः मिश्र वंशिय महिला असल्याने त्यांना आलेल्या अनुभवांमधूनच या नाण्याची संकल्पना साकारली गेली आहे.

सुनक यांनी याच वर्षाच्या सुरुवातीलाच हे नाणे सुरू केले होते. त्यासाठी “वुई टू बिल्ट ब्रिटन’ या मोहिमेच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी दीर्घ संवाद केला. देशातील वंचित, शोषित गटांबरोबर देशाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या आफ्रो आशियाई, भारतीय वंशिय नागरिकांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करून या गटांमध्ये देशातील समरसता घडवून आणण्यासाठी या नाण्याची संकल्पना राबवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.