पुणे – शहरात यंदा एप्रिलच्या पहिल्या 16 दिवसांतच विक्रमी 35.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांत एप्रिलमध्ये झालेल्यापैकी यंदाचे प्रमाण विक्रमी ठरले आहे. एप्रिल 2021 मध्ये 28.3 मिमी पावसाची नोंद झाली होती.
शहरात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. तर, एप्रिलमध्ये पहिल्यांदाच गारपीट झाली आहे. दि.1 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान शहरात 45.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मार्चमध्ये 9.7 मिमी, तर एप्रिलमध्ये 35.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच अवकाळी पाऊस पडण्याचे दिवस देखील वाढले आहेत. अवकाळी पावसाचा परिणाम शहरातील कमाल आणि किमान तापमानावर झाला आहे. शहरात या वर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक किमान तापमान 13 एप्रिल रोजी 21.2 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. तर कमाल तापमान 12 एप्रिल रोजी 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवले आहे. यामुळे एप्रिलमधील तापमानदेखील घटले आहे, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
किमान तापमान वाढणार
शहरात सातत्याने अवकाळी पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. किमान, कमाल तापमानही घटले आहे. पण, पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. यामुळे रात्री उकाडा वाढण्याचा अंदाज आहे. पण, मागील वर्षी एप्रिलच्या तुलनेत यावर्षी कमाल तापमान कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.