पुणे -बालभारती-पौडफाटा पर्यायी रस्त्याला पर्यावरणप्रेमी तसेच राजकीय पक्षांकडून विरोध होऊ लागला आहे. याबाबत जनजागृती फेरी काढून तीव्र विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन बॅकफूटवर आले आहे. याबाबत अंतिम निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे घेणार आहे, असे सांगण्यात येत आहे. यासाठी पुढील आठवड्यात दि. 24 किंवा 25 एप्रिल रोजी बैठक होणार आहे.
सेनापती बापट रस्ता तसेच विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून बालभारती ते पौड फाटा हा रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला आहे. हा रस्ता विधी महाविद्यालयाच्या जागेतून जाणार असून पुढे टेकडीफोड न करता तो पूर्णत: पौड फाट्यापर्यंत इलिव्हेटेड प्रस्तावित करण्यात आला आहे. तर या रस्त्यासाठी सुमारे 250 कोटींचा खर्च येणार आहे.
तर या रस्त्यामुळे पुढील काही वर्षांत विधी महाविद्यालय रस्त्याला जोडलेल्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, बीएमसीसी महाविद्यालय रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताणही कमी होणार असल्याचा प्रशासनाचा दावा असून सध्या सेनापती बापट रस्त्यावरून कर्वेरस्त्याकडे जाण्यासाठी सुमारे 25 ते 30 मिनिटे जातात. मात्र, हा रस्ता झाल्यास हा वेळे पाच ते दहा मिनिटांवर येणार असल्याचे पालिकेकडून सांगितले जात आहे. मात्र, महापालिकेचा दावा चुकीचा असून हा रस्ता झाल्यास वेताळ टेकडीचे पर्यावरण धोक्यात येणार असल्याचे सांगत पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे.