स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोघांना केले अटक…
सविंदणे -उरळगाव (ता. शिरूर) येथील भीमा नदी पात्रात शिर नसलेला व धडाचे तुकडे असलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा तपास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेला लावण्यात यश मिळाले आहे.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार उमाकांत कुंजीर, दत्तात्रय तांबे, पोलीस नाईक जनार्दन शेळके, गुरू जाधव, राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल समाधान नाईकनवरे, अक्षय जावळे, शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलिस नाईक संजय जाधव यांचे पथक तयार करून तपासासाठी रवाना केले होते. या पथकाने सर्वप्रथम गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाचा व त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता, या व्यक्तिचे नाव बापु तावजी शिंदे (रा. मलठण, ता. शिरूर) असल्याचे निष्पन्न झाले.
गोपनीय बातमीच्या आधारे जालिंदर सुखदेव थोरात (रा. वाघाळे, ता. शिरूर) व हिरामण तुकाराम चोरमले (रा. उरळगाव, ता. शिरूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जालिंदर सुखदेव थोरात याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आपला दाजी बापू शिंदे यांचा दृश्यम चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पुरावा मागे न ठेवता खून करण्याचा कट तयार केला. त्यानुसार बापू शिंदे यांस मलठण येथून उरळगाव येथे मासे आणण्यासाठी जाण्याचा बहाणा करून उरळगाव येथे घेऊन गेले. तेथे ठरल्याप्रमाणे दुसरा आरोपी हिरामण चोरमले हा कुऱ्हाड घेऊन आला व त्या दोघांनी संगनमत करून बापू शिंदे यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे हात, पाय, पोट कुऱ्हाडीने तोडून मृतदेह भीमा नदीच्या पात्रात टाकून दिला.
निर्घृण खुनाचा गुन्हा पथकाने उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पथकास बक्षीस जाहीर केले आहे.