मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा पुढाकार : दरमहा विद्यावेतनही मिळणार
पुणे – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागातील विविध प्रकल्प, योजनांच्या अंमलबजावणीच्या कामाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रथमच आंतरवासितेची (इंटर्नशिप) संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
“एमएचआरडी इंटर्नशीप स्कीम’अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दोन ते सहा महिन्यांसाठी आंतरवासिता करता येणार असून, त्यासाठी प्रति महिना 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“एमएचआरडी’ने या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. आंतरवासिता योजनेत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मंत्रालयाने काही निकष निश्चित केले आहेत. इन्स्ट्यिूट ऑफ एमिनन्स हा दर्जा मिळालेल्या शिक्षण संस्था किंवा 2019च्या “एनआयआरएफ’ क्रमवारीत पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवलेल्या किंवा क्यूएस क्रमवारीतील पहिल्या 100 संस्थांतील विद्यार्थी योजनेत अर्ज करू शकतील. तीन किंवा चार वर्षे मुदतीच्या अभ्यासक्रमातील किमान दोन वर्षे पूर्ण केलेले, पाच वर्षे मुदतीच्या अभ्यासक्रमातील किमान तीन वर्षे पूर्ण केलेले किंवा नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये आणि एप्रिल-मे 2020 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेत अर्ज करता येईल.
मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार…
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, समाजशास्त्र, मानव्यता, विधी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या योजनेत संधी मिळणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. आंतरवासिता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना केलेल्या कामासंदर्भातील अहवाल सादर करावा लागेल. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असेही मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. या योजनेची अधिक माहिती “एमएचआरडी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.