बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. घरी पोहोचवण्यासाठी लोक त्याचे आभार मानत आहे. यातच आता सोनूच्या मदतीचे आभार मानण्यासाठी एका महिलेने आपल्या नवजात बाळाचे नाव चक्क सोनू सूद ठेवल्याचे समोर आले आहे.
याबाबत एका ट्विटर युजरने माहिती शेअर केली. फरहान नावाच्या ट्विटर युजरने सांगितले की, गर्भवती महिलेला मुंबईवरून दरभंगाला जायचे होते. अशा स्थितीमध्ये सोनू सूदने त्यांना मदत केली. सोनूच्या मदतीमुळे महिला दरभंगाला पोहोचू शकली. आता त्या महिलेने आपल्या बाळाचे नाव सोनू सूद असे ठेवले आहे. सोनू सूदनेदेखील हे ट्विट रिट्विट करत हा माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोनू सूद सोशल मीडियावर प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मेसेजला उत्तर देत असून, प्रत्येकाच्या मदतीसाठी पुढे येत आहे. सोशल मीडियावर या अभिनेत्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.