“केंद्रीय मंत्र्यांनी सहा महिने काहीच काम केले नाही; ते फक्त बंगालच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त होते”

कोलकता – केंद्रीय मंत्र्यांनी मागील सहा काहीच काम केले नाही. ते फक्त बंगालच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त राहिले. त्यामुळे देश आणखी करोना संकटात लोटला गेला, असा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता काबीज केली. त्यानंतर प्रथमच विधानसभेत बोलताना ममतांनी मोदी सरकार, भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली. नवे संसद भवन, पंतप्रधान निवासस्थान बांधण्यासाठी मोदी सरकार प्रचंड खर्च करत आहे. 

मात्र, ते सरकार देशातील जनतेला मोफत करोना लस देण्यास तयार नाही. बांधकामासाठी येणाऱ्या खर्चापेक्षाही लसीकरणासाठी कमी खर्च होईल, असे त्या म्हणाल्या. निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे. 

जनतेचा कौल पचवणे जड जात असल्याने तो पक्ष हिंसाचाराला चिथावणी देत आहे, या आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला. निवडणूक आयोगाने थेट मदत केली नसती; तर भाजप बंगालमध्ये 30 जागाही जिंकू शकला नसता. निवडणूक आयोगाच्या बाबतीत तातडीने काही सुधारणा करण्याची गरज आहे, अशी आक्रमक भूमिकाही ममतांनी मांडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.