पिंपरी – देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शहा पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्राने विकसित केलेल्या एकात्मिक पोर्टलचे त्यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे.
केंद्र सरकार बहुराज्यीय सहकारी संस्थांना (मल्टीस्टेट) त्यांच्या व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी डिजिटलवर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) चिंचवड येथे केंद्राने विकसित केलेल्या एकात्मिक पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह मल्टिस्टेट पतसंस्था, नागरी पतसंस्थांचे व सहकार क्षेत्रातील सुमारे दीड हजार सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सहकारातून समृद्धी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने केंद्रातील सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयही पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वाधिक बहुराज्यीय संस्था असलेल्या महाराष्ट्रात हा महत्त्वाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. बहुराज्यीय सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक 2022 हे लोकसभेत 25 जुलै रोजी मंजूर झाले आहे. देशपातळीवर बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 अंतर्गत संपूर्ण देशामध्ये एकूण 1 हजार 555 बहुराज्यीय सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 654 म्हणजे तब्बल 42 टक्के बहुराज्यीय संस्था नोंदणीकृत झालेल्या आहेत.