पुणे – स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. या क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लवकरच सहकाराबाबत नवीन धोरणाची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केली.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या (वैम्निकॉम) वतीने पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहा बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सहकार मंत्रालय सचिव देवेंद्रकुमार सिंह, अपर सचिव विजय कुमार, वैम्निकॉम’च्या संचालक डॉ. हेमा यादव, व्ही. सुधीर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षात देशात अनेक सरकार आली अन् गेली. मात्र, सहकारासाठी मंत्रालय सुरू करण्याचा विचार कोणीच केला नव्हता. नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्त्व ओळखून हे मंत्रालय सुरू केले. सहकार क्षेत्राच्या मजबुतीकरणाची आवश्यकता आहे. देशातील प्रायमरी ऍग्रिकल्चर सोसायटी अर्थात पॅक्स’चे कॉम्पुटरायझेशन करण्यात येईल.
त्यामुळे जिल्हा बॅंक, सहकारी बॅंका आणि नाबार्डसोबत जोडण्यात येईल. तसेच मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. देशातील प्रत्येकाची प्रगती सहकार क्षेत्राच्या माध्यमातून व्हावी यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे,’ असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान पाच दशकांपासून कार्यरत असून आता याला स्वायत्तेचा दर्जा मिळावा,’ अशी अपेक्षा हेमा यादव यांनी व्यक्त केली.
शहा यांच्या हस्ते सहकार संदर्भ’ पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. पीजी-डीसीबीएमच्या 53 व 54 व्या बॅचमधील 38, पीजीडीएम-एबीएमच्या 27 व्या बॅचमधील 73 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनु सिंग, प्रास्ताविक व स्वागत डॉ. हेमा यादव यांनी केले. आभार व्ही. सुधीर यांनी मानले.