– जावई नितीन पाटील व मुलीकडे कसून चौकशी
पुणे – टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटीहून अधिक रकमेचे घबाड जप्त करण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी सुपे सुपे याची मुलगी आणि जावयाकडे केलेल्या चौकशीमध्ये हे घबाड सापडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शिक्षक पात्रता परिक्षा ( टीईटी) मध्ये अटक आरोपी तुकाराम सूपे याने पुणे शहर येथे सन 2019 -2020 मधील शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये त्यांनी परिक्षार्थी कडून पैसे स्विकारुन परिक्षेच्या निकालात फेरफार करुन त्यांना पात्र
केले होते. त्या अनुषंगाने दाखल माहिती तंत्रज्ञान कायदा सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम ( सुधारीत) प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
या गुन्हयामध्ये सायबर पोलीसांनी दि. 16/12/2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करुन त्यांची पुढील तपासकामी दि. 23/12/2021 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती.
तत्पुर्वी दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामदेव सुपे यास अटक करुन तात्काळ त्याचे घराची घरझडती घेतली. त्याचे घरातून या परीक्षेच्या माध्यमातून गैरलाभाने प्राप्त संपत्तीपैकी 88 लाख 49 हजार 980 रु रोख व या संपत्तीतून खरेदी केलेले 5 ग्रॅम सोन्याचे नाणे, 5 तोळयाचे दागिने 5 लाख 50 हजार रुपयाची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
त्यापुढे आरोपीचे पोलीस कोठडीतील तपासादरम्यान सुपेने पैशाच्या दोन बॅगापैकी त्याचे मुलीकडे एक पैशांची बॅग ठेवल्याची तसेच त्याचे जावयाने त्याचे मित्राकडे आरोपीकडील दुसरी पैशांची बॅग ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानूसार जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून खातरजमा केली. त्यानंतर तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक घाडगे व तपास पथक, दोन पंच, आरोपीत तुकाराम सुपे, जावई व मुलगी यांना ते राहावयास असलेल्या चहोली, आळंदी या ठिकाणी जावून तेथे
पाहणी केली असता 97 हजार रुपये मिळाले.
परंतू माहिती प्रमाणे त्या दोन्ही बॅगा न मिळाल्याने त्यांची मुलगी व जावयाकडे कसून चौकशीकेली. तेव्हा नितीन पाटीलचा मित्र विपीन याचे वाघोली येथील बंद फ्लॅट मध्ये बॅग ठेवल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी जावून त्या फ्लॅट ची झडती घेतली असता फ्लॅटमध्ये त्या दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेस मिळाल्याने त्या ताब्यात घेण्यात आल्या. त्यामध्ये रोख रक्कम 1 कोटी 58 लाख 35 हजार इतकी रक्कम असल्याचे आढळले.
तसेच त्या बॅगांसोबत आढळलेल्या सुटकेस व एका बॅग मधील प्लास्टीकच्या पिशवीमध्ये दागिण्यांच्या डब्या आढळल्या. त्यात एकूण 44 वेगवेगळ्या प्रकारचे दागिणे आढळले असून प्रत्येक प्रकारामध्ये एक किंवा अनेक नग आहेत. त्याशिवाय सायबर पोलीस ठाण्याकडील आरोग्य विभाग संबंधाने दाखल सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतरपरिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम ( सुधारीत) कलम तपासादरम्यान संजय शाहूराव सानप (40 रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड ) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्यास दि.19 /12/ 2021 रोजी अटक केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार घाडगे हे करीत आहेत. या गुन्हयातील ही कामगिरी सायबर पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, उपनिरीक्षक डफळ, पडवळ, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नितेश शेलार, नितिन चांदणे, कोमल भोसले, सौरभ घाटे यांनी केली आहे.