रफाह (गाझा पट्टा) – चार महिन्यांपूर्वी हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये यूएनआरडब्लूएमधील काही कर्मचारी गुंतले असल्याचा आरोप झाल्यानंतर ९ देशांनी संयुक्त राष्ट्राच्या या एजन्सीला वित्त पुरवठा करणे थांबवले आहे. त्यामुळे गाझा पट्ट्यामध्ये संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारी मदत लक्षणीय घटली आहे, असे संयुक्त राष्ट्राचे शरणार्थी विषयक संस्थेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.
इस्रायल-हमासच्या युद्धामुळे गाझामधील स्थिती अतिशय दयनीय झाली असताना अचानक ९ देशांनी वित्त पुरवठा थांबवणे धक्कादायक आहे, असे पॅलेस्टाईन शरणार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीचे प्रमुख फिलीप लाझारिनी यांनी म्हटले आहे. गाझामधील पॅलेस्टिनींना ही अतिरिक्त शिक्षा अनावश्यक होती, असे त्यांनी म्हटले आहे.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यामध्ये या एजन्सीमधील १२ कर्मचारी सहभागी असल्याच्या आरोपावरून लाझरिनी यांनी पदावरून हटवले आणि त्यांच्या सहभागाच्या आरोपांची तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर ब्रिटन, जर्मनी आणि इटलीसह ९ देशांनी या एजन्सीला वित्त पुरवठा करणे तातडीने थांबवले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या या एजन्सीचे १३ हजार कर्मचारी सध्या गाझामध्ये कार्यरत आहेत. स्थलांतर केलेल्या २ लाख ३० हजार पॅलेस्टिनींना अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण या एजन्सीच्या माध्यमातून केले जाते आहे.
तात्पुरत्या युद्धविरामासाठी बायडेन प्रयत्नशील
इस्रायलने तात्पुरत्या युद्धविरामाला मंजूरी द्यावी, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे दोन प्रतिनिधी इस्रायलशी चर्चा करत आहेत. हमासच्या ताब्यात असलेल्या १०० ओलिसांची सुटका करून घेण्यासाठी इस्रायलने दोन महिन्यांसाठीचा हा युद्धविरोम मान्य करावा, असा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
या युद्धविरामाच्या काळात गाझामध्ये अतिरिक्त मदत साहित्य पुरवण्यास इस्रायलकडून मान्यता मिळवण्याचाही प्रयत्न आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्यामुळे त्याच्या अटी आणि शर्थी आताच जाहीर केल्या गेलेल्या नाहीत.