सेंट पीटर्सबर्ग – युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत स्वीडन आणि नेदरलॅंड संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. साखळी लढतीत पहिल्या सामन्यात नेदरलॅंडने ऑस्ट्रियाचा 2-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात स्वीडनने बलाढ्य स्लोव्हाकियाचा 1-0 असा पराभव केला.
स्वीडन आणि स्लोव्हाकिया या सामन्यात पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. त्यानंतर मात्र, स्वीडनने दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक खेळ केला. त्यांच्या एमिल फोर्सबर्गने मिळालेल्या पेनल्टीचे 77 व्या मिनिटाला गोलमध्ये रूपांतर करताना स्लोव्हाकियाच्या गोलकीपरला चकवले व स्वीडनचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर संपूर्ण वेळेत स्लोव्हाकियाला स्वीडनचा बचाव भेदता आला नाही.
त्यापूर्वी झालेल्या अन्य एका सामन्यात नेदरलॅंडने आक्रमक खेळ करत ऑस्ट्रियावर 1-0 अशी आघाडी घेतली होती. 11 व्या मिनिटाला मेमफीस डिपेने गोल केला. नेदरलॅंड संघाकडून दुसऱ्या हाफमध्ये डेन्झेल डमफ्राइजने 67 व्या मिनिटाला गोल केला व आघाडी 2-0 अशी वाढवली.
अन्य साखळी सामन्यात युक्रेनने नॉर्थ मसेडोनियाला 2-1 असे पराभूत केले. डेन्मार्कने सामना सुरू झाल्यावर दुसऱ्याच मिनिटाला गोल केल्यानंतरही बेल्जियमकडून 2-1 असा पराभव स्वीकारला.
रोनाल्डोचे तीस कोटी फॉलोअर्स
कोकाकोला प्रकरणातून आणखी प्रसिद्धी पावलेला पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवर तब्बल तीस कोटी फॉलोअर्स असलेला पहिलाच खेळाडू ठरला आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रात आयकॉन मानला जात असलेल्या रोनाल्डोच्या नावावर हा एक विक्रमच नोंदला गेला आहे.