ममता बॅनर्जी आणखी एका राज्यात देणार भाजपला धक्का ?

आगरतळा -पश्‍चिम बंगालमध्ये भाजपची पीछेहाट झाल्यानंतर शेजारील त्रिपुरा राज्यात त्या पक्षात अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे. एवढेच नव्हे तर, बंडाच्या पवित्र्यात असणाऱ्या त्रिपुरामधील भाजपच्या काही आमदारांच्या संपर्कात तृणमूल कॉंग्रेस असल्याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळे आणखी एका राज्यात भाजपला राजकीय धक्का देण्यासाठी तृणमूल सरसावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलने विजयाची हॅट्ट्रिक साधली. तृणमूलच्या घवघवीत यशाने भाजपचे स्वप्न भंगले. त्यानंतर तृणमूलने बंगालबाहेर विस्तारण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्याची सुरूवात शेजारील त्रिपुरातून करण्याच्या हालचाली त्या पक्षाने सुरू केल्या आहेत.

त्यातून तृणमूलने त्रिपुरात सत्तेवर असणाऱ्या भाजपमधील नाराज नेत्यांशी संपर्क साधण्याची रणनीती अवलंबल्याचे समजते. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांच्या कार्यपद्धतीवर भाजपमधील काही आमदार नाराज असल्याचे लपून राहिलेले नाही.

त्यातून आमदारांच्या एका गटाने काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे गाऱ्हाणेही मांडले होते. भाजपमधील नाराजीचा राजकीय लाभ उठवण्यासाठी आता तृणमूल प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.