मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे.
हा निर्णय तात्पूरत्या स्वरूपाचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी असणार आहे. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 6 नोव्हेंबरला या निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे अंधेरीची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी मतदान होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड करून भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळण्यासाठी प्रयत्न केले. दोन्ही गटाचा वाद न्यायालयात पोहोचला. तेथून वाद निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवले तसेच शिवसेना या नावाचााही वापर करता येणार नसल्याचे सांगितले. नवीन नाव आणि पक्षचिन्हासाठी दोन्ही गटाकडून पर्याय मागविण्यात आले. त्यानंतर आता दोन्ही गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे.
दरम्यान, दोन गटातील संघर्षातील ही पहिलीच निवडणूक होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी जय्यत तयारी सुरु केली असून आम्हीच विजयी होणार असे दोघांकडूनही सांगण्यात येत आहे.