जळगाव – आज ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं, नाही तर मी उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेत घुसून दाखवेल,’ असे म्हंटले होते. या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यामुळे या सभेसाठी पाचोऱ्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाकडून या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कालच सभास्थळी दाखल होते. यावेळी त्यांनी सभास्थळाची पाहणी केली होती. आज होणाऱ्या या सभेमुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. याआधी झालेल्या सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आता या सभेत ते काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
गुलाबराव पाटलांना ओपन चॅलेंज
ठाकरे गटाने आंदोलन करत गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसून दाखवावं, असे म्हंटले आहे. इतकेच काय तर उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा आणि 51 हजार रुपयांचं बक्षीस घेऊन जा, असे चॅलेंजही गुलाबराव पाटील यांना ठाकरे गटाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट विरुध्द शिंदे गट सामना रंगणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
कसा असणार दौरा ?
उद्धव ठाकरे दुपारी 11 वाजता मुंबई येथून जळगावकडे खाजगी विमानाने रवाना होतील. दुपारी 12 वाजता जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर ते येथून वाहनाने पाचोराकडे निघतील. यानंतर दुपारी 1:30 वाजता पाचोरा शहरात वरखेडी फाटा येथून महाराणा प्रताप चौकपर्यंत मोटरसायकल रॅली काढली जाईल. महाराणा प्रताप चौक येथे त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाईल. दुपारी 2 वा. ते 4:30 पर्यंत निर्मल सिड्स रेस्ट हाऊस येथे जेवण आणि राखीव वेळ असेल.
दुपारी 4:30 ते 5:30 साधारण 1 तास ते निर्मल सिड्स समोरील नवीन इमारतीजवळ मोकळ्या जागी जळगाव जिल्ह्यातील उद्योजक यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर निर्मल सिड्स येथील भारतातील प्रथम अत्याधुनिक नवीन तयार करण्यात आलेल्या लॅबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाईल. याशिवाय माजी आमदार आर ओ पाटील यांचा 11 फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील.