मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा उद्यापासून सुरू होत आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथून या दौऱ्याची सुरूवात होत आहे. शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत येणार आहेत.
पक्षातील फुटीनंतर शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज्यात बंजारा समाजाची असलेली मतदारसंख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचे असलेले अनन्यसाधारण स्थान यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने बंजारा समाजाची वोट बॅंक मोलाची ठरु शकते. अलिकडे शिंदे-फडणवीस सरकारने बंजारा समाजासाठी निधी जाहीर केला आहे.
पोहरादेवत बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत श्री. सेवालाल महाराजांची समाधी येथे आहे. यासोबतच समस्त बंजारा समाजाची कुलदेवता जगदंबा मातेचे मंदिरही पोहरादेवीत आहे. राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या जवळपास दीड कोटींच्या आसपास आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष बंजारा व्होटबॅंक आपलीशी करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात पोहरादेवीपासून करणार आहेत.