उद्धव ठाकरे यांना कायद्याचे ज्ञान नाही – सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलाचे वक्तव्य

पाटणा – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी आता सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतची प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अशातच आज राजपूत कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी याबाबत केलेल्या काही वक्तव्यांमुळे नवा वाद चिघळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

एएनआय या नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना वकील विकास सिंह यांनी, “उद्धव ठाकरे यांना कायद्याचे ज्ञान नाही. फौजदारी खटल्यामध्ये खटला दाखल करणाऱ्याला सत्यापर्यंत पोहचवायचं असतं, तक्रारदाराला नव्हे. बिहार पोलिसांनी याबाबत खटला दाखल करून घेतला असल्याने प्रकरणाच्या तपासाचे काम बिहार पोलिसांचे आहे उद्धव यांचे नाही.” असं वक्तव्य केलं.

रिया चक्रवर्तीच्या पेहरावावरूनही प्रश्न                                                                                                     दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वकील विकास सिंह यांनी रिया चक्रवर्तीला तिच्या पेहरावावरून लक्ष्य केलं. ते म्हणाले, “खटला दाखल झाल्यानंतर रियाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ती काय बोलत आहे यापेक्षा तिने काय पेहराव केलाय अधिक महत्वाचं आहे. तिने व्हिडिओमध्ये परिधान केलेला सलवार कुर्ता हा ड्रेस आयष्यात याआधी कधीच घातला नसेल. यामागे ती एक साधी महिला असल्याचं भासवायचा प्रयत्न आहे.”

 तत्पूर्वी आज बिहार पोलिसांतर्फे, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासासाठी काही दिवसांपूर्वी  महाराष्ट्रात दाखल झालेल्या बिहार पोलिसांच्या टीमला महाराष्ट्र पोलिसांकडून कोणतीही गैरवर्तणूक मिळाली नसून याबाबतचे वृत्त साफ खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.