मुंबई – शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाली आहे. उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गालबोट लागेल असे कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका, उत्साहात वाजत गाजत या असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, 66 पासून आमचा विजया दशमीचा मेळावा होतो. न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला. माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन, उत्साहाने, वाजत गाजत या, पण शिस्तीने या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, वारस्याला गालबोट लावू नका.. इतर काय करतील त्याची कल्पना नाही, पण आपली परंपरा जपा. तेज्याच्या वारस्याला गालबोट लागेल असे कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशासह जगभरातील मराठी माणसाचे लक्ष असते. त्यामुळे उत्साहात या असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यानंतर आज युक्तीवादानंतर न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.