Guinness book of world record : सिडनी- गिनीज बुक असो किंवा इतर कोणतेही विक्रम पुस्तक असो त्यामध्ये नाव नोंदणी होण्यासाठी काहीतरी वेगळा विक्रम करण्याची गरज असते. याच एका दृष्टिकोनातून ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने एक वेगळा विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव मिळवले आहे. या व्यक्तीने इंग्रजी मध्ये एक ते 10 लाख हे आकडे टाईपराईटरवर टायपिंग केले आहेत.
त्याच्या या विक्रमाची दखल गिनीज बुकने घेतली असून विक्रम पुस्तकात त्याची नोंद करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील मुदझिंबा प्रदेशात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव लेस स्टीवर्ड असे होते. त्याने 1982 मध्ये अशा प्रकारचा विक्रम करण्याचे ठरवले होते. पण हा विक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला तब्बल 16 वर्षाचा कालावधी लागला आणि टाईपराईटरवर एक ते दहा लाख हे आकडे टाईप करण्यासाठी त्याला तब्बल 19900 कागद लागले.
काम पूर्ण करण्यासाठी त्याला या 16 वर्षांच्या कालावधीमध्ये सात टाईपराईटरचा वापर करावा लागला. ह्या कामासाठी त्याला 1000 पेक्षा जास्त इंक रिबीनही लागल्या एक ते दहा लाख हे आकडे त्याने अंकामध्ये न लिहिता अक्षरांमध्ये त्याचे स्पेलिंग लिहिले असल्यामुळे त्याच्या या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला होता.
महत्त्वाचे म्हणजे असा विक्रम करत असताना कोणतीही चूक गृहीत धरली जात नाही त्यामुळे या एक हे दहा लाख आकडे शब्दांमध्ये लिहीत असताना कोठेही स्पेलिंग मिस्टेक किंवा अन्य चूक झालेली नाही. 2018 मध्ये या विक्रमाची गिनिजबुक मध्ये नोंद झाली असली तरी गिनिज बुकने आपल्या ताज्या घडामोडींच्या नियतकालिकामध्ये याविषयीचा उल्लेख पुन्हा एकदा केला आहे.