नवी दिल्ली : शाळेत सुधारीत राष्ट्रीयत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) यावर टीका करणारी नाटुकली शाळेत सादर केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक केलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याच्या मातेला 14 दिवस कारागृहात काढल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला.
इयत्ता चौथी, पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाटीकेत पंतप्रधान मोदी यांना शिविगाळ केल्याचा आरोप होता. त्यावरून शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शाळेच्या मुख्याध्यापक फरीदा बेगम (वय 50), एका विद्यार्थ्याची आई नझबुन्नीसा (वय 36) यांना 30 जानेवारीला अटक करण्यात आली होती. नेलीश रक्षाल याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती.
ही नाटूकली सादर करणारी मुले दहा वर्षापेक्षा कमी वयाची होती. त्यांच्या नाटकाच्या पटकथेत नसणारे शब्द शिकवल्याच्या आरोपावरून एका विद्यार्थ्याच्या मातेला अटक केली होती, असे पोलिसांनी सांगितले. शाळेने मोदी यांच्याविषयी द्वेष असणारी वाक्ये पटकथेत नसल्याचा दावा संस्थेने केला होता.
ही नाटूकली समाज माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांचा वापर केल्याचा आरोप रक्षाल यांनी केला होता. या शाळेत महाविद्यालयीनपूर्व शिक्षण देण्यात येते.