पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेने एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. अपघातात अकरा वर्षांचा सहप्रवासी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. भरधाव मोटार चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली आहे.
आर्य विनोद गलांडे (वय १८, रा. वडगाव शेरी) असे मृत्यमुखी पडलेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे. अपघातात आर्यचा लहान भाऊ वेदांत (वय ११) गंभीर जखमी झाला आहे. आर्यचा काका भास्कर गलांडे (वय ४१) यांनी या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी मोटारचालक रोहित अनिल दळवी (वय २२, रा. कीर्तने बाग, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे. वेदांत खराडी येथील क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी दररोज दुपारी जातो. त्याचा मोठा भाऊ आर्य त्याला दुचाकीवरून मैदानावर सोडण्यास दररोज जायचा. आरोपी दळवी एका गॅरेजमध्ये कामाला आहे. गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी आलेल्या एका ग्राहकाची मोटार घेऊन दळवी मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खराडी गावठाण चौकातून निघाला होता. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार आर्य आणि वेदांत जखमी झाले. उपचारादरम्यान आर्यचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करत आहेत.