शिक्रापूर – पुणे शहरातून वेगवेगळ्या भागातून दुचाक्या चोरून कमी किमतीमध्ये विक्री करणाऱ्या युवकाला चोरीच्या दोन दुचाकींसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. अमोल विठ्ठलराव राऊत (रा. शिक्रापूर, चाकण रोड) असे जेरबंद करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
तो चोरीच्या दोन दुचाकी कमी किमतीमध्ये विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक उपनिरीक्षक पंदारे, मुकेश कदम, हवालदार जनार्दन शेळके, अजित भुजबळ, राजू मोमीन, पोलीस नाईक मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे यांसह आदींनी सदर ठिकाणी सापळा लावला असता त्यांना तो दुचाकीसह मिळून आला.
यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील दिघी व पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरल्या असल्याचे कबूल केले.