इंदापूर – केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून बेरोजगारांचा प्रश्न जटील बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर कॉंग्रेस कामिटीच्या वतीने इंदापूर शहरात बोंबाबोंब आंदोलन करून राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी युवकांकडून डिग्रीचे प्रमाणपत्र जाळून आंदोलन केले. तसेच केंद्रविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
इंदापूर शहरातील तहसील कार्यालयासमोर कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, इंदापूर येथे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखालील इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने डिग्री जाळत बेरोजगार दिन म्हणून आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सावंत म्हणाले की, देशातील दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले मोदी सरकार आपल्या आश्वासनांची पूर्ती करु न शकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशभरात कॉंग्रेसने अनोखे आंदोलन केले. तहसील कार्यालयासमोर चूल मांडून युवकांनी प्राप्त पदवीच्या छायांकित प्रती जाळून मोदी सरकारचा निषेध केला.
यावेळी इंदापूर तालुका कॉंग्रेस युवकचे अध्यक्ष अमोल बंडगर, जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील, चेतन कोरटकर, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान कॉंग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, जिल्हा सरचिटणीस जाकीर काझी, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, निवास शेळके, महादेव लोंढे, प्रदीप शिंदे, युवराज गायकवाड, दादा शेंडगे, युन्नुस पठाण, हर्षल धांडोरे, अनिकेत चंदणशिवे, अनिल कांबळे, विशाल कुलकर्णी, कार्यकर्ते, युवक उपस्थित होते.