न्हावरे- न्हावरे – आलेगाव पागा (ता. शिरूर) रस्त्यावर घोडगंगा कारखान्याजवळील शेततळ्याजवळ थांबलेल्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. या अपघातात येथील शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कन्हैया इनामदार काळे (वय 60, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत त्यांचा मुलगा गणेश काळे यांनी न्हावरे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली. सोमवारी (दि.27) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कन्हैया काळे हे न्हावरे-आलेगाव रस्त्याच्या कडेला नातू सचिन काळे याच्यासमवेत पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या आपल्या मुलाची वाट पाहत बसले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने (क्र. एमएच 12 एलटी 2866) कन्हैया काळे यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात कन्हैया काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन टेम्पोचालक अपघात स्थळावरून पळून गेला. अज्ञात टेम्पोचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार संजय कोलते करीत आहेत.