पुणे -शहरात दि. 12 ते 29 जून असे 17 दिवस जी-20 परिषद होणार आहे. यासाठी महापालिकेकडून शहरातील प्रमुख 15 रस्त्यांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल 150 कोटी रुपयांची मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे.
हॉटेल मेरियटसह नगर रस्त्यावरील हॉटेल हयातमध्ये ही परिषद होणार आहे. यावेळी होणाऱ्या परिषदेत पर्यटन परिषदेचाही समावेश असल्याने महापालिकेची शहर सुशोभिकरणासाठी चांगलीच धावपळ उडणार आहे. शहरात जानेवारी 2023 मध्ये पहिली दोन दिवसांची जी-20 परिषद पार पाडली. तिचा दुसरा टप्पा आता होत आहे. त्यामुळे महापालिकेस संपूर्ण शहर पुन्हा एकदा चकाचक करावे लागणार आहे. यापूर्वीची परिषद सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल मेरियटमध्ये पार पडली. त्यावेळी परिषदेचे प्रतिनिधी विमानतळ-हॉटेल-पुणे विद्यापीठ याच मार्गावर येणार असल्याने महापालिकेने केवळ त्याच भागांती रस्ते तसेच चौकांचे सुशोभीकरण केले होते. मात्र, आता ही परिषद जास्त दिवस आहे. तसेच त्यात पर्यटन परिषद असल्याने तसेच हे प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहेत.
मागील परिषदेवेळी महापालिकेने “सीएसआर’ची मदत घेतली होती. तसेच राज्य शासनानेही विशेष बाब म्हणून 50 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, यावेळी 15 रस्ते निवडण्यात आल्याने आता पालिकेस मोठा खर्च येणार असून, हा खर्च जवळपास 150 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी शहरातील रंगरंगोटीवर पुणेकरांनी सोशल मीडियायद्वारे पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. तरीही, पुन्हा तशाच रंगरंगोटीचा कित्ता गिरवला जाणार आहे.
विभागप्रमुखांवर रस्त्याची जबाबदारी
ज्या 15 रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे, त्या रस्त्यांची जबाबदारी आता एकट्या पथ विभागाकडे न ठेवता विविध 15 विभाग प्रमुखांकडे असेल. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत. या अधिकाऱ्यांकडे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती, रस्त्यांकडेला रंगरंगोटी तसेच चौकांच्या सुशोभीकरणाचे काम असणार आहे. तसेच, या अधिकाऱ्यांच्या मदतीला बांधकाम, विद्युत, भवन तसेच पथ विभागाचे कर्मचारी असणार आहेत.
हे रस्ते होणार चकाचक
दुरुस्ती केल्या जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांमध्ये सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, विमानतळ रस्ता, कर्वे रस्ता, पाषाण रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता या मुख्य रस्त्यांसह यांना जोडणाऱ्या इतर काही रस्त्यांचा समावेश असणार आहे.