पुणे -“गो फर्स्ट’ या विमान कंपनीने दि. 3 मे आणि 4 मे रोजी पुण्याहून सर्व उड्डाणे रद्द केली. त्यामुळे नियोजन केलेल्या सर्व प्रवाशांना जबर धक्का बसला आहे. अचानक त्यांना अन्य कंपन्यांच्या विमानांचे दुप्पट ते तिप्पट दराने तिकीट काढावे लागले. दरम्यान, संबंधित विमान कंपनी आर्थिक अडचणीत असून, विमानांचा तुटवडा असल्याचेही सांगितले जात आहे.
मर्यादित पर्यायांमुळे पुण्यातील प्रवाशांना विमान प्रवासासाठी आधीच जादा पैसे मोजावे लागत आहेत. शिवाय, काही दिवस आधी बुकिंग करावे लागत आहे. त्यातच “गो फर्स्ट’ कंपनीने उड्डाणे रद्द केल्याने परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 10 दिवसांत या एअरलाइनच्या प्रवाशांना उड्डाणे रद्द आणि विलंबाचा सामना करावा लागला आहे.
“गो फर्स्ट’ विमान कंपनी पुण्याहून दिल्ली, नागपूर आणि बंगळुरू येथे सेवा पुरवते. ज्यात दिल्लीसाठी सर्वाधिक विमाने उड्डाण करतात. सद्यस्थितीत पुण्याहून कोलकाता सेवा या कंपनीने वेळापत्रकातून वगळली आहे. दरम्यान, ही विमान कंपनी आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यामुळे भविष्यातील सेवांबद्दल अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.
कंपनीविरुद्ध रोष
पुण्यातून उड्डाणे रद्द केल्याने गो-फर्स्ट कंपनीविरुद्ध प्रवाशांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत, या कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. तर, कंपनीकडून मात्र “माफ करा, तुमची अडचण समजू शकतो’ अशी उत्तरे दिली जात आहेत.
अन्य कंपन्यांना स्लॉट मिळतील का?
पुणे-लोहगाव विमानतळ येथून “गो फर्स्ट’ विमानांचे दि. 3 आणि 4 मे रोजी प्रत्येकी 3 उड्डाणे नियोजित होती. मात्र, ही सर्वच रद्द झाली आहेत. त्याऐवजी अन्य कंपन्या हे स्लॉट घेतील, अशी अपेक्षा विमानतळ प्रशासनाला आहे. परंतू, तसे न झाल्यास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तर, तिकीट रद्द झालेल्या प्रवाशांना त्यांचे पैसे परत करत असल्याचे गो-एअर कंपनीने अधिकृत ट्विटर हॅंडलवर जाहीर केले आहे.