बंगळुरू, दि. 26 – कर्नाटक राज्यात करोनाची स्थिती आता अधिकच गंभीर बनली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात करोनाचे तब्बल 34 हजार रुग्ण आढळून आल्यानंतर या राज्यात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता 13 लाख 39 हजार इतकी झाली असून सुमारे पंधरा हजार लोकांचा करोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
ही सारी स्थिती लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पूर्ण दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करणारे कर्नाटक हे एकमेव भाजपशासित राज्य ठरले आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणूनच त्याचा विचार करा, अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे. त्यामुळे भाजपशासित राज्ये लॉकडाऊन जाहीर करण्यास कचरत आहेत.