पुणे – सकाळी आठची वेळ.. मळवली स्थानकाजवळ दोन रेल्वे गाड्या उभ्या.. नागरिकांमध्ये काहीकाळासाठी गोंधळ.. आणि सोशल मीडियावर रेल्वेचे फोटो “व्हायरल’ झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. मात्र, या घटनेमध्ये तांत्रिक बिघाडाचे कारण नसल्याचे समजताच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पुणे ते लोणावळा मार्गावरील “ऍटोमॅटीक ब्लॉक सिग्नल’मुळे मळवलीजवळ पुण्याहून सुटलेली लोणावळा लोकल थांबविण्यात आली. या लोकलच्या पाठोपाठ पुण्याहून सुटलेली डेक्कन क्वीन थांबविण्यात आली. या दोन्ही गाड्यांमध्ये 200 मीटरहून अधिक अंतर होते. परंतु, लोकल आणि डेक्कन क्वीन धडकल्याचा समज प्रवाशांना झाला. काही वेळातच मळवली येथील फोटो सोशल मीडियावर “व्हायरल’ झाल्याने अफवा पसरू लागल्या. परिणामी, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. यानंतर सकाळी 8.15 वाजता डेक्कन क्वीन मुंबईकडे रवाना झाली.
… दोन गाड्यांमध्ये 1 किलोमीटरचे अंतर
लोणावळा ते चिंचवड परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाने “ऍटोमॅटीक ब्लॉक सिग्नल’ बसविले आहेत. यामुळे एकामागे एक गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये दोन गाड्यांमध्ये सुमारे एक किलोमीटरचे अंतर राहील, याची काळजी घेतली जाते. सिग्नल मिळाल्यानंतर ताबडतोड गाडीचा वेग कमी होऊन किमान एक मिनिट गाडी उभी थांबते. यामुळे गाड्या वेळेत धावण्यास मदत होण्यासह अपघातांचा धोका टळणार आहे. लोणावळा ते चिंचवड या 15 किलोमीटरच्या मार्गावर ही यंत्रणा बसवून पूर्ण झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पुणे स्थानकापर्यंत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
प्रवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
लोकलला दोन्ही बाजूला चालकांची केबिन असते. त्यामुळे डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना लोकल त्यांच्या दिशेने येत असल्याचा भास झाला. मात्र, लोकल एकाच जागी उभी असून, ती लोणावळ्याच्या दिशेला जात असल्याचे कळाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, पुणे-लोणावळा लोकल 40 मिनिटे आणि डेक्कन क्वीन 27 मिनिटे मळवलीजवळ थांबविली होती. त्यामुळे या गाड्यांना पुढील प्रवासात काही प्रमाणात विलंब झाला. परिणामी, नोकरदारांची गैरसोय झाली.