श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील एका न्यायालय संकुलाजवळ मंगळवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती सुरक्षा यंत्रणांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तेथे व्युहरचना केली होती.
तेथे एका वाहनातून हे दहशतवादी आले त्यांचे वाहन सुरक्षा जवानांनी रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या गोळीबाराला जवानांनीही गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. त्यात हे दोघे ठार झाले. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार म्हणाले की मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते.
अरबाज मीर आणि शाहिद शेख अशी त्यांची नावे आहेत.ते पुलवामा जिल्ह्याचे रहिवासी असल्याचेही त्यांनी सांगितले. कुमार म्हणाले की, हे दोघेही गेल्या आठवड्यात सुरक्षा जवानांच्या तावडीतून निसटून गेले होते. ठार झालेल्या अतिरेक्यांकडून एक एके रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.