सांगली -मिरज तालुक्यातील पाटगाव येथे येथे सिगारेट न दिल्याच्या कारणावरून शंभर परप्रांतीयांच्या जमावाने चहा टपरीवर हल्ला केला. यावेळी जमावाने एक कार पेटवून दिली. तसेच दुकानाची आणि तीन मोटारसायकलींची तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दुकानमालक विजयसिंह नानगुरे यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत सात जणांविरुध्द फिर्याद दिली असून कन्हैयाकुमार व रुपेंद्रकुमार तोमर (दोघे रा. मध्यप्रदेश) यांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. 12) त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. मिरज- पंढरपूर रस्त्यावर महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या कामासाठी दिलीप बिल्डकॉन कंपनीने पाटगाव हद्दीत खडी, वाळूसाठी स्टोन क्रशर व हॉटमिक्स प्लॅन्ट सुरू केला आहे.
या प्लॅन्टजवळ विजयसिंहराव नानगुरे याची चहाची टपरी आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीचे कामगार व्यवस्थापक कन्हैयाकुमार हा नानगुरे यांच्या चहाच्या टपरीजवळ आला. यावेळी त्याने नानगुरे यांच्या कामगाराकडे सिगारेट देण्याची मागणी केली. नानगुरे यांच्या कामगाराने सिगारेट नसल्याचे सांगितले. यामुळे नानगुरे यांचा कामगार आणि कन्हैयाकुमार या दोघांत वादावादी झाली. यानंतर कन्हैयाकुमार याने सुमारे शंभर परप्रांतीय कामगारांचा जमाव नानगुरे यांच्या चहाच्या टपरीजवळ बोलावून घेतला.
यावेळी परप्रांतीय कामगारांनी दुकानावर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेकीत नानगुरे व त्यांच्या कामगार जखमी झाले आहेत. परप्रांतीयांचा जमाव आक्रमक झाल्याने नानगुरे व त्यांच्या कामगारांनी घटनास्थळावरुन पलायन केले. परप्रांतीयांच्या मोठ्या जमावाने हल्ला केल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पळून जाणाऱ्या वरील दोघांना अटक केली.