पुणे – पुणे शहर पोलीस दलात कार्यरत दोन सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यातील एक अधिकारी नुकतेच काही आठवड्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. आतापर्यंत करोनामुळे
8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गुरुवारी एकाच दिवशी दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांच्या
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विलास सरवदे (वय 55) आणि संतोष जगन्नाथ गायकवाड (वय 58) असे अधिकाऱ्यांचे नाव आहे.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात कार्यरत सरवदे यांना 25 ऑगस्ट रोजी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. ते 31 ऑगस्ट रोजी शहर पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.