बारामती – समर्थ नगर येथील करोना संक्रमित रुग्णाच्या बारा नातेवाईकांना तपासणीसाठी पुणे येथील औंध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यापैकी सात जणांचो अहवाल हाती आले असून त्यातील दोन व्यक्ती करोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. संक्रमित रुग्णाचा मुलगा व सून करोना संक्रमित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे.
श्रमिकनगर येथील रिक्षा चालकास करोनाची बाधा झाल्यानंतर समर्थ नगर येथे करोनाचा दुसरा रुग्ण सापडला शहराच्या दृष्टीने ही धक्कादायक बाब आहे. श्रमिकनगर येथील पहिल्या रुग्णास करोनाची बाधा कोठून झाली हे अद्याप निष्पन्न झाले नाही. तोपर्यंत समर्थ नगर येथे दुसरा रुग्ण सापडला. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यात या रुग्णाने कोठेही प्रवास केलेला नाही.
घराबाहेर न पडलेल्या रुग्णाला करोनाची बाधा झाली कशी? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. कुटुंबातील कोणाकडून ही बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासना समोरील चिंता वाढली असून करोनाचे सावट गडद झाले आहे. करोनाचे वाढते संकट पाहता बारामतीकरांनी खबरदारी घ्यावी घरातून बाहेर पडू नये.