सेऊल – जगभर करोना विषाणुने थैमान घातले असताना आणि सारे जग त्याच्या मुकाबल्यात व्यस्त असताना उत्तर कोरियाने मात्र आपला वादग्रस्त क्षेपणास्त्र विकसनाचा कार्यक्रम सुरूच ठेवला असून त्यांनी आज अल्प पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्याचे वृत्त आहे. त्यांनी पुर्व किनाऱ्यांवरून ही क्षेपणास्त्रे डागली. ती समुद्रात पडली अशी माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षण सूत्रांनी दिली.
मात्र या क्षेपणास्त्रांच्या संबंधातील आणखी तपशील समजू शकलेला नाही. उत्तर कोरिया आणखीही काही चाचण्या घेण्याच्या तयारीत असून आमचे लष्कर त्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे असे दक्षिण कोरीया सरकारच्या सूत्रांनी सांगितले. उत्तर कोरियाने या महिन्याच्या सुरूवातीला अशाच प्रकारच्या चाचण्या घेतल्या होत्या. तथापी त्या क्षेपणास्त्र चाचण्या नव्हत्या तर लांबपल्ल्याच्या तोफेच्या त्या चाचण्या होत्या असे उत्तर कोरियाने सांगितले होते.