सातारा (प्रतिनिधी): येथील राधिका चौकात एका युवकाला मारहाण करून लुटणार्या टोळीतील दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. साहील आयाज इनामदार (रा. केसरकर पेठ, सातारा), तेजस रमेश कदम (रा. कोडोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी आकाश संदीप साबळे (रा. शिवथर ता. सातारा) शाकीब शेख यांना पोलिसांनी अटक केल्याने या गुन्ह्यात संशयितांचा आकडा चार झाला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 21 मार्च रोजी शहरातील राधिका चौकात एका युवकाला पाच संशयितांनी मारहाण करून लुटले होते. यावेळी संशयितांनी फिर्यादीचा मोबाइल व रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तेव्हापासून पाचही संशयित पोलीस दप्तरी फरारी होते. त्यातील आकाश साबळे याला स्थानिक गुन्हे शाखेने बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरातून अटक केली होती. तर शाकीब शेख याला शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
मात्र, इतर मुख्य संशयित फरार असल्याने शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी एक पोलीस पथक संशयितांच्या मागावर ठेवले होते. दि. 28 रोजी दोन्ही संशयित भूविकास बॅंक परिसरात दुचाकीवरू येणार असल्याची माहिती वायकर यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, सपोनि विशाल वायकर, संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हसन तडवी,लैलेश फडतरे,अमित माने,स्वप्नील कुंभार, पंकज मोहिते, अोंकार यादव, मोहन पवार यांनी कारवाई केली.