कान्हूर मेसाई येथील घटना
शिक्रापूर – कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असताना हॉटेल चालकाने जेवण दिले नाही म्हणून हॉटेल चालकासह अन्य दोघांना दगडाने मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये दोघे जण जखमी झाले असून मारहाण करणाऱ्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कान्हूर मेसाई येथील हॉटेल माथेरानचे चालक किरण साकोरे हे हॉटेलमध्ये असताना गावातील कैलास ननवरे हा युवक हॉटेलमध्ये आला आणि जेवण मिळेल का? असे विचारले त्यावेळी साकोरे यांनी हॉटेल बंद आहे त्यामुळे फक्त पार्सल मिळेल, असे सांगितले. त्यावेळी कैलास याने मला येथेच जेवायचे आहे. माझी जेवायची व्यवस्था तू येथेच करायची, असे बोलून वाद घालून शिवीगाळ, धक्काबुक्की करू लागला.
यावेळी गावातील रामदास भंडारी व सुखानंद तांबे हे मध्ये आले असताना कैलास याने तुम्ही कोण मधे येणारे असे म्हणून त्या दोघांना देखील दगडाने मारहाण केली. यामध्ये भांडण सोडविणारे भंडारी व तांबे हे दोघे देखील जखमी झाले आहेत. याबाबत किरण तान्हाजी साकोरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी कैलास सुबान ननवरे (रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर करीत आहेत.