पुणे – सामूहिक बलात्कारच्या दोन घटनांनी राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणारे पुणे शहर हादरले. दत्तवाडी परिसरात एका 25 वर्षीय गतिमंद मुलीवर चार नराधमांनी घरात नेऊन सामूहिक बलात्कार केला. तर दुसऱ्या घटनेत चिंचवड येथे अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत हा प्रकार वारंवार केला.
पुणे शहरातील दत्तवाडी परिसरात 25 वर्षीय गतिमंद मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दुर्वेश जाधव (36), श्रीकांत सरोदे (36), आदित्य पवार (19) व आशिष मोहिते (18) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलगी भारती विद्यापीठ परिसरातील घराकडे निघाली असताना, आदित्य पवारने तिला गोड बोलून स्वारगेट परिसरातून जनता वसाहतीत नेले. तेथे इतर साथीदारांना बोलवून घेत त्यांनी एका बंद खोलीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने स्थानिकांनी या घरास बाहेरून कडी लावून पोलिसांना माहिती दिली. दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी येत दरवाजा तोडून चार आरोपींना अटक करत तरुणीची सुटका केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर याबाबत तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी श्रीकांत सरोदे हा 2019 मधील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून न्यायालयात सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटलेला आहे तर इतर आरोपी मोलमजुरीचे काम करणारे आहेत. पोलीसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करत तिला पालकांचे स्वाधीन केले.
एका अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केले. तसेच या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून त्याची क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना चिंचवड येथे घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जून 2020 ते 24 ऑगस्ट 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडली. आरोपी पीडित 14 वर्षीय मुलीला तुझ्या घरच्यांना मारून टाकेल. तसेच तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी देऊन आरोपी रहात असलेल्या घराजवळ तसेच एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.