पुणे शहरात दोन तास धूमशान

पुणे – विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी-पाणी झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल 72 मीमी पाऊस झाला. या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत जोर कमी होता. मात्र, दुपारी दोन तास धुवाधार पावसाने जून महिन्यातील कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला.

राज्यात मान्सून दाखल झाल्यावर पुणे शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता पुन्हा मोठा खंड पडणार अशी शक्‍यता होती. दरम्यान, गुरुवारी (दि.27) सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, दुपारी तीननंतर ढगाळ वातावरण झाले आणि क्षणात पावसाला सुरवात झाली. नेहमीप्रमाणी काहीवेळ पावसाच्या हलक्‍या सरी पडतील असे वाटत असताना, पावसाने धुव्वादार बॅटींग सुरू केली. शहराच्या मुख्य भागासह उपनगरांतील कोथरूड, वारजे, कात्रज, औंध, येरवडा, विश्रांतवाडी, हडपसर, धनकवडी या भागांत मुसळधार पाऊस झाला. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच कर्वेरस्ता, वारजे, डेक्कन या भागांतही पाण्याची मोठी तळी साचली होती.

पावसामुळे शहरात झाडपडीच्या घटना
शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. कसबा, घोलेरोड आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आयसीआयसीआय बॅंकेसमोरील दोन असे एकूण सात झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडेलेली झाडे कापून बाजूला केली.

Leave A Reply

Your email address will not be published.