पालखी सोहळ्यासाठी महावितरण सज्ज

अधिकृत वीजपुरवठा घेऊन अपघात टाळण्याचे आवाहन

सातारा – फलटणमध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन व मुक्कामाच्या ठिकाणी वीजसुरक्षेसह वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे काम करून महावितरणने सुरळीत वीजपुरवठ्यासह 24 तास सेवेची तयारी पूर्ण केली आहे. या कालावधीत वीजसेवेसाठी 30 अभियंते व 170 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या 3 जुलैला संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा लोणंद येथे दोन दिवस मुक्कामी आहे. त्यानंतर तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी दि. 5 जुलैपर्यंत ही पालखी मुक्कामी राहणार आहे. पालखी मार्ग व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी महावितरणशी संबंधित सर्व सेवांसाठी संबंधित कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्यासह अभियंते व जनमित्रांचे नाव व मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्यात येत आहेत. वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वीजवाहिनी किंवा वीजयंत्रणेतून वीजचोरी करू नये. आकडा टाकू नये किंवा एखाद्या वीजजोडणीतून इतर ठिकाणी अनधिकृत वीजपुरवठासुद्धा घेऊ नये. महावितरणकडून मागणीप्रमाणे तात्पुरती वीजजोडणी तत्काळ देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

महावितरणकडून चार दिवसांच्या या पालखी सोहळ्याचा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी वीजवाहिन्यांसह संपूर्ण वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात आली आहेत. यामध्ये उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, झोल पडलेल्या तारा ओढणे, स्पेसर्स लावणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ऑईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे, रोहित्रांना लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरण तसेच संरक्षक कुंपणाची देखभाल व दुरुस्ती, स्टेवायर व वीजखांबांना पीव्हीसी पाइप तसेच फिडर पीलरला पीव्हीसी कव्हर लावणे आदी कामांचा समावेश आहे.

प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधीक्षक अभियंता उदय कुलकर्णी व फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप यांनी वीजसेवेचे नियोजन केले आहे. यासोबतच महावितरणचे 30 अभियंते व सुमारे 170 जनमित्र हे पालखी मार्ग व मुक्कामांच्या ठिकाणी वीजसेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहेत.

पालखी सोहळा व मुक्कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे. वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वीजवाहिनी किंवा वीजयंत्रणेतून वीजचोरी करू नये. आकडा टाकू नये किंवा एखाद्या वीजजोडणीतून इतर ठिकाणी अनधिकृत वीजपुरवठा सुद्धा घेऊ नये. महावितरणकडून मागणीप्रमाणे तात्पुरती वीजजोडणी तत्काळ देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच आपात्कालिन उपाय म्हणून कोणत्याही ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते तातडीने बदलण्यासाठी अतिरिक्त रोहित्र असलेले वाहने तयार ठेवण्यात आली आहेत. 


निशिकांत राऊत प्रभारी जनसंपर्क अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)