कॅबाझोन, (अमेरिका) – आग विझवण्याच्या कामावर असलेल्या दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाल्यामुळे किमान तिघांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेला रिव्हरसाईड कौंटीजवळ लागलेली आग विझवण्याच्या कामावर असताना ही दुर्घटना घडली.
धडक झाल्यानंतर एक हेलिकॉप्टर सुखरूपपणे जमिनीवर उतरले. मात्र दुर्दैवाने दुसरे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर लागलेली आग विझवण्यासाठी रिव्हरसाईड कौंटीच्या फायर डिपार्टमेंटकडून मदत आणि
बचाव पथक तातडीने रवाना करण्यात आले आहे. मात्र जवळच्या पालेभाज्यांच्या मळ्याला ही आग लागली आणि झपाट्याने पसरली. यामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टरदेखील जळून गेले.
कोसळलेल्या हेलिकॉप्टरमुळे 4 एकरच्या शेतजमिनीवर देखील आग पसरली होती. ती नंतर विझवण्यात आली. पहिल्या हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप जमिनीवर उतरू शकले आणि त्यांच्यापैकी कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेची चौकशी नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डाकडून करण्यात येत आहे.