शेवगाव – तालुक्यातील वडूले बुद्रूकच्या नंदिनी नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे. रणजीत नंदू काते (वय 34) व अमृत रघुनाथ चोपडे (वय 40, दोघेही रा. वडुले बु.) अशी दोघा मृत तरुणांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, काते हा तरुण रविवार (दि.17) पासून घरातून बेपत्ता होता. याबाबत त्याचे सासरे महादेव भारस्कर (रा. रामनगर,शेवगाव) यांनी फिर्याद दिली होती. सोमवारी त्याचे कपडे गावाजवळील नंदीनी नदीच्या पुलाजवळ आढळून आले. त्यामुळे तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडाला असल्याची शंका गावकऱ्यांना आली.
त्याला शोधण्यासाठी सोमवारी सायंकाळी त्याचा मित्र अमृत रघुनाथ चोपडे हा पाण्यात उतरला होता. मात्र बराच वेळ होऊनही तोही वर न आल्याने ग्रामस्थांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने नदीपात्रातील पाण्यात शोधाशोध केली असता चोपडे याचा मृतदेह हाती लागला.
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास काही नागरिकांना काते यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलीस पाटील राजेंद्र पांजरे खबर दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्यास वर काढले. चोपडे यांच्यावर काल रात्री तर काते यांच्यावर आज दुपारी शवविच्छेदन करुन वडुले बु. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.