पिंपरी – देशात अचानक आलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घरातील कर्त्या पुरुषांच्या मृत्यूमुळे तर अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत. कोरोनामुळे अनेक ठिकाणी घरातील दोघांचा, तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अश्यातच आता पिंपरीतील दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आदित्य आणि अपूर्व अशी या दोन मृत भावंडांची नावे आहेत. आदीत्यचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर अपूर्वचे लग्न ठरले होते. येत्या दिवाळीत तो विवाहबंधनात अडकणार होता. पण कोरोनाने त्याचे स्वप्न हिरावले आहे.
या दोघांसह आई-वडील आणि आदित्यची पत्नी यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. या पाचही जणांना पिंपरीतील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणूला हरवून पुन्हा एकत्र येऊ असा सर्वांना विश्वास होता. ते सर्वजण एकमेकांना फोन करून धीर देत होते. पण दोघां सख्ख्या भावांनी कोरोना विषाणूपुढे हार पत्करावी लागली. ऑक्सिजन पातळीत घट झाल्याने शुक्रवारी दुपारी अपूर्वने आणि शनिवारी पहाटे आदित्यने जगाचा निरोप घेतला आहे.
तर, वडील पुण्यातील वायसीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. दुसरीकडे सासू आणि सून कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. पण दोन कर्त्या मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांना आपल्या अश्रूंचा बांध आवरता येत नाहीये.