अकोलेत दोन बोगस डॉक्‍टरांना केली अटक

अकोले – तालुक्‍यातील राजूर परिसरात अकोले तालुक्‍यातील वैद्यकीय पथकाने छापा टाकून दोन बोगस डॉक्‍टरांना रंगेहाथ अटक केली. राजूर पोलिसांत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्‍वास गोरंक गोविंद (वय 34, रा. मान्हेरे) व पलासराय (पूर्ण नाव समजले नाही, वय 35, आबेवंगण) अशी या बोगस डॉक्‍टरांनी नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असणाऱ्या खासगी व वैद्यकीय व्यावसायिकांच्या परवान्यांची तपासणी करून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

तसेच तालुकास्तरीय बोगस वैद्यकीय व्यावसायिक समिती व तालुका आरोग्य अधिकारी यांनाही आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अकोले तालुका वैद्यकीय अधिकारी इंद्रजित गंभिरे, आरोग्य विस्तार अधिकारी बी. व्ही. भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. फलके, पर्यवेक्षक मरभळ, यादव, कोकाटे यांच्या पथकाने मान्हेरे येथे विश्वास या बोगस डॉक्‍टरच्या दवाखान्यावर छापा टाकला असता, तेथे इंजेक्‍शन, औषधे, सलाईन आढळून आले. त्यानंतर आंबेवगण येथेही छापा टाकला असता तेथेही पलासराय याच्याकडे रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेले साहित्य, औषधसाठा सापडला.

या दोन्ही मुन्नाभाईना राजूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तालुका आरोग्याधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना आदिवासी भागातील आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन रुग्णांवर उपचार करून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करत ते मालामाल झाले आहेत.
अनेक वर्षांनंतर अकोले तालुका वैद्यकीय अधिकारी वर्गाने आदिवासी भागातील दोन बोगस डॉक्‍टरांवर प्रथमच कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील बोगस डॉक्‍टरांचा शोध घेऊन पोलिसांत गुन्हे दाखल करणार आहे.

डॉ. इंद्रजित गंभिरे तालुका वैद्यकीय अधिकारी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)