रखडलेल्या नारायणगाव बाह्यवळणाचे काम सुरू

नारायणगाव – नारायणगाव बाह्य वळणाचे गेले अडीच वर्षे रखडलेले काम अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पहिल्या प्रयत्नामुळे आज (दि. 23) सुरू करण्यात आले.

खेड घाट व नारायणगाव बाह्यवळणाचे कामाचे टेंडर होऊन 6 महिने झाले तरीही कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यामध्ये कामाची कुठलीही ऑर्डर, ऍग्रीमेंट आदी बाबींची पूर्तता झाली नव्हती. कंत्राट झाल्यावर आणि ते विशिष्ट कंपनीला मिळाल्यानंतर नऊ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असते; परंतु 5 महिने होऊन गेले तरी कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष जागेवर कृती संबंधित कंपनीकडून करण्यात आली नव्हती. यासाठी प्रत्यक्ष जागेवरील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा रखडलेला विषय, कंत्राटदाराच्या तांत्रिक अडचणी, आणि नॅशनल हायवेच्या दिल्लीतील प्रलंबित यासंदर्भातील प्रक्रिया गोष्टीं कारण होत्या.

मात्र, याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 28 जून 2019 ला पुणे जिल्हा अधिकाऱ्यांची प्रतिनिधींसह भेट घेत भूसंपादनाबाबत प्रलंबित प्रश्‍न तात्काळ सोडण्याची सूचना केली. त्यानंतर मागील आठवड्यात दिल्लीमध्ये अधिवेशनादरम्यान केंद्रीय राजमार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वित्त आणि प्रशासन प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेऊन कंत्राटदाराला संबंधित कामाची सुरुवात करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित तांत्रिक बाबी सोडवून काम चालू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नारायणगाव बायपासच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. या बाह्यवळणाचे कामाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, सरपंच जयश्री बॅंकर, उपसरपंच सचिन वारुळे, दिलीप कोल्हे, संजय वारुळे, बाळासाहेब खिलारी, शशिकांत वाजगे, वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर,अरविंद लंबे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी , गणेश वाजगे, अतुल आहेर, वैजयंती कोऱ्हाळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे इंजिनियर शर्मा, अरुण चौधरी, अझर शेख उपस्थित होते.

डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेचे स्वागत
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या बाह्यवळणाच्या कामात लक्ष घातले; परंतु सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने नारायणगाव बाह्यवळणाच्या रखडलेल्या रस्ताच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणे त्यांना शक्‍य नव्हते. केवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये आणि वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांनी युवा नेते अतुल बेनके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते उद्घाटन करून घ्या, असे सांगितले. डॉ. अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.
चाळकवाडी टोलनाका आंदोलकांना विशेष भेट

15 जुलै 2018 ला नारायणगाव बाह्यवळणासह उर्वरित पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसंदर्भात तोडगा काढावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते अतुल बेनके व कार्यकर्त्यांनी टोल नाका जन आंदोलन केले होते. यावेळी टोल बंद करण्याची जवाबदारी आमदार शरद सोनवणे यांची व बाह्य वळणाचे रखडलेले काम सुरू करण्याची जवाबदारी माझी, अशी घोषणा अतुल बेनके यांनी दिली होती, हे काम सुरू झाल्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून अतुल बेनके यांना ही वाढदिवसाची भेट मिळाली आहे.

खेड घाट व नारायणगाव बाह्य वळण 9.31 किमी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज झाला असून नारायणगाव बाह्यवळण 4.9 किमी आणि खेड घाट 4.4 किमी रस्ता असून, यासाठी 72.90 कोटी मंजूर झाले आहेत.
– अतुल बेनके, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)