हिंगोली – शहरातील आनंद नगर भागात बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्यात येत असल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक व दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
छाप्यात पोलिसांनी 17 लाख 47 हजार 350 रुपयांच्या बनावट नोटा व इतर 6 लाख 45 हजारांचे साहित्य असे एकूण 24 लाख 30 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर भागामध्ये अरूण हनवते यांच्या घरामध्ये भाड्याने राहणारा एक इसम व त्याची महिला साथीदार बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, रूपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडघन, वसंत चव्हाण, आशा केंद्रे, विजय घुगे यांनी सापळा रचून छापा मारला.
या छाप्यात संतोष सुर्यवंशी देशमुख यांच्याकडे 100, 200, 500, 2000 रुपये किमतीच्या बनावट नोटा, प्रिंटर, स्कॅनिंग व झेरॉक्स असे साहित्य तसेच नकली नोटा तयार करण्याकरिता लागणारे साहित्य तसेच 13 महालक्ष्मीच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत.