पुणे – मानवी अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी वाहतूक शाखेने बुधवारी “ग्रीन कॉरिडोर’ तयार केला होता. यामुळे पुणे विमानतळापासून बाणेर येथील रुग्णालयात 15 मिनिटांमध्ये लहान आतडे पोहोचविण्यात यश आले.
पुणे विमानतळापासून बाणेर येथील एका खासगी रुग्णालयातील रुग्णासाठी मानवी अवयव रुग्णवाहिकेतून नेणार असल्याचे रुग्णालयाच्या वतीने वाहतूक शाखेला कळविण्यात आले. त्यानंतर बुधवारी (दि.2) दुपारी 3:43 वाजता मानवी अवयव घेऊन जाणारी रुग्णवाहिका विमानतळ येथून बाणेर येथील रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी “ग्रीन कॉरिडोर’ केला होता.
मानवी लहान आतडे बाणेर येथे “ग्रीन कॉरिडोर’द्वारे न्यायचे होते. पुणे विमानतळ ते बाणेर 20 किलोमीटरचा प्रवास दुपारी 3:43 ते 3:58 या वाजेपर्यंत अशा केवळ 15 मिनिटांत करण्यात आला. या मार्गांवरील येरवडा, विमानतळ, खडकी, चतु:शृंगी या वाहतूक विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो बंदोबस्त ठेवला होता, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
वाहतूक शाखेने वेगवेगळ्या मानवी अवयवांचे तत्काळ प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी “ग्रीन कॉरिडोर’चे प्रयोग केले आहेत. यापूर्वी कमी कालावधीत केलेले “ग्रीन कॉरिडोर’ यशस्वी झाले आहेत, असे वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.