महाबळेश्‍वरमध्ये सापडला अडीच लाखांचा दारूसाठा

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वरपासून अंदाजे दहा किलोमीटरवरील चिखली गावाच्या हद्दीतील “रॉकफोर्ड’ बंगल्यामधील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे दोन लाख 54 हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास छापा मारून जप्त करण्यात आला. याप्रकरणी मालकासह दोघांवर गुन्हा करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक टिके यांना “रॉकफोर्ड’ मध्ये बेकायदेशीर व अनधिकृतपणे दारूसाठा असल्याची माहिती मिळताच टिके यांनी पाचगणीचे सपोनि विकास बडवे यांच्यासह वाई, पाचगणी व महाबळेश्‍वर येथील पोलिसांच्या पथकांनी गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. काही रूम्स, स्टोअर रूम, किचनची झडती सुरु केली.

परंतु, पोलिसांना कोठेही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे कुणी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच टिके यांनी मात्र तपासणी सुरूच ठेवली. “रोकफोर्ड’ च्या मुख्य गेटच्या दक्षिण बाजूस असलेल्या पत्र्याच्या बंदिस्त खोलीत विदेशी दारूचा साठा आढळून आला. शेडमधील सर्व गोवा बनावटीचा दारू साठा हस्तगत केला. हा सर्व साठा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला.

याप्रकरणी मालक संजय गायकवाड (वय 46), केअरटेकर आनंद पांडुरंग पारठे (वय 45 रा. घोगलवाडी ता. महाबळेश्‍वर) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 फ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई सातारा पोलीस अधीक्षक डॉ. तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक अजित टिके यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्‍वर, पाचगणी व वाई ठाण्यांच्या यांच्या संयुक्त पोलीस पथकाने पार पडली.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मदन मुळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.